निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील प्रयाेगशील शेतकरी राम कावले यांना जेमतेम एक एकर शेती आहे. वडिलोपार्जित शेती प्रत्येक वर्षी उन्हाळ्या कोणतेही पीक घेतले जात नव्हते. यंदा मात्र, त्यांनी योग्य व्यवस्थापन व नियोजन करून मिरचीचे उत्पादन घ्यायचे ठरवले.
त्यासाठी जुन्या विहिरीतील गाळ काढून पाण्याची व्यवस्था करण्यात आली. एक एकर जागेत ठिंबकद्वारे पाण्याची व्यवस्था केली. सरी पाडण्यात आल्या, मल्चिंग पेपरचा उपयोग करत १० हजार मिरची रोपांची लागवड करण्यात आली. पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने बांधालगत त्यांनी पाण्यासाठी माेठा हौद बांधला. या हाैदातील पाणी लागेल तेव्हा वापरण्याची सुविधा उपल्ब्ध केली. सदरचे पाणी देत उन्हाळ्यात मिरचीची शेती फुलविली. खत, फवारणी, खुरपणी त्याचबराेबर योग्य खताची मात्रा दिली. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांकडून माहिती मिळवून हा पहिला प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे. सध्याला प्रत्येक एका झाडाची उंची चार फूट आहे. एका झाडाला १२५ ते १५० मिरची लगडली आहे. एका एकरात जवळपास दीड ते दोन लाखांची मिरची हाेणार असल्याचे सांगण्यात आले. चार दिवसांत मिरचीचा पहिली तोड होणार आहे.
काेराेना काळाची फलनिष्पत्ती...
राम कावले हे कामाच्या शाेधासाठी एका कंपनीत दाखल झाले हाेते. दरम्यान, कंपनीत कामावर लागताच काेराेनाचा काळा सुरु झाला. गत मार्चमध्ये लाॅकडाऊन जाहीर झाल्याने पुन्हा घराचा रस्ता धरावा लागला. खचून न जाता वडिलोपार्जित एक एकर शेतीत चांगले उत्पन्न घ्यावे, हा निश्चय करुन मिरचीची लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यातून चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा त्यांना सध्याला आहे. काेराेनाच्या काळात खचून न जाता, आपल्या हाती आहे त्या साधनांचा, शेतीचा, अवजारांचा उपयाेग करुन, संकटावर मात करता येइल, याचा आदर्श वस्तूपाळच शेतकरी राम कावले यांनी घालून दिला आहे. त्यांच्यासाठी काेराेनाचा काळ एक संधी ठरला आहे.
कर्जापाेटी साेडले हाेते गाव...
राम कावले म्हणाले, डोक्यावर बँकेचे कर्ज होते. यासाठीच लॉकडाऊनपूर्वी कंपनीत काम करावे, असे ठरवत गाव साेडले हाेते. मात्र, काेराेनाच्या महामारीने पुन्हा गावचाच रस्ता धरायला भाग पाडले. काेराेनाच्या लॉकडाऊनमुळे कंपनीतील लागलेले काम गेले. शेवटी खचून न जाता गावाकडे आलाे. वडिलांची असलेली एक एकर शेतीत काही तरी प्रयाेग करण्याचा निर्धार केला. आजा नियाेजन आणि आहे त्या अल्प पाण्याचे केलेल्या व्यवस्थापनातून हिरवी मिरची बहरली आहे.