अहमदपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शनिवारी एकूण कोरोना बाधितांची संख्या १ हजार ३६० वर पोहोचली आहे. शनिवारी तालुक्यातील ३३७ बाधित आहेत. शहरात १७० तर ग्रामीण भागात १६७ बाधित आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने कडक नियम लागू केले आहेत. दरम्यान, सध्या संचारबंदी आहे. तसेच विकेंड लॉकडाऊन ही आहे. मात्र, बाधितांचा आलेख कायम वाढत आहे. विविध कारणे सांगून काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही विनामास्क, नाहक फिरणाऱ्यांची संख्या दिसून येत आहे. विविध कारणांसाठी दुचाकी व चारही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसत आहे.
रस्त्यावरील गर्दी रोखण्यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य व पालिकेच्या वतीने शनिवारपासून अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. विनामास्क आणि अनावश्यक घराबाहेर पडणारे नागरिक, दुचाकीस्वारांना थांबवून त्यांची शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅपिड ॲंटीजन तपासणी केली जात आहे. यात जे पॉझिटिव्ह आढळतील, त्यांना मरशिवणी येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. निगेटिव्ह आलेल्यांना घरीच राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत. या नव्या उपक्रमामुळे नागरिकांची रस्त्यावरील संख्या अत्यंत कमी झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तीच रस्त्यावर दिसत आहेत.
शनिवारी सकाळपासून या अभिनव उपक्रमास सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात ४६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ६ पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांस संस्थात्मक विलगीकरणात दाखल करण्यात आले आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. नरहरी सुरनर, डॉ. राजेश्वरी सोळंके, डॉ. शुभांगी सुडे, बसवराज लोहारे, भीमा कच्छवे, भानुदास गव्हाणे यांच्यासह आरोग्य पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
दररोज तपासणीचा उपक्रम...
दररोज तपासणीचा उपक्रम घेण्यात येणार आहे. दररोज एका चौकांमध्ये आरोग्य विभागाची टीम रुग्णवाहिकेसह थांबणार आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे व पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी सांगितले.