विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी १ हजार ६४१ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ३७६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर २६१८ व्यक्तींची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यात ५९३ बाधित आढळले आहेत. दोन्ही चाचण्या मिळून ९६९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. प्रयोगशाळेतील चाचणीचा पॉझिव्हीटी रेट २२.९ टक्के तर रॅपिड ॲन्टीजन टेस्टचा पॉझिव्हिटी रेट २२.७ टक्के आहे. १ मार्चपासून दररोज ७०० च्या पुढे रुग्ण आढळत आहेत. गेल्या सात दिवसांत ४ हजार ७११ रुग्ण आढळले आहेत. सद्य:स्थितीत रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये १५६ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. तर गंभीर मेकॅनिकल व्हेंटीलेटरवर २५ रुग्ण असून ३५ रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटीलेटरवर आहेत. मध्यम लक्षणाची परंतु ऑक्सिजनवर असलेले ४११ रुग्ण उपचार घेत आहेत. २९६ रुग्ण मध्यम परंतु विनाऑक्सिजनवर आहेत. तर सौम्य लक्षणाची ६ हजार १०५ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी दिली.
४७२ रुग्ण कोरोनामुक्त...
प्रकृती ठणठणीत झाल्याने ४७२ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. त्यात होमआयसोलेशमधील ४०९, एक हजार मुला- मुलींच्या वसतीगृहातील २९, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील २०, मरशिवणी कोविड केअर सेंटरमधील ४ आणि खाजगी रुग्णालयातील १० रुग्णांचा समावेश आहे. अशा एकूण ४७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी ४२ दिवसांवर...
आतापर्यंत ३० हजार ५०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून रिकव्हरी रेट ७९.९४ टक्के आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४२ दिवसांवर आला आहे. जो की ७०० दिवसांवरुन ४२ दिवसांवर आला आहे. ही बाब चिंताजनक असून मृत्यूचे प्रमाण २.१ टक्के आहे. वाढती रुग्ण संख्या चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमित मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.