ग्रामीण भागातील एका ५० वर्षीय शेतकऱ्यास मळमळ करणे, धाप लागणे अशी लक्षणे जाणवू लागल्याने तो त्रस्त झाला होता. त्याची तपासणी करण्यात आली असता, अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तातडीने सीटी स्कॅन केले. तेव्हा स्कोअर १३ असल्याचे आढळले. त्यामुळे येथील लाईफ केअर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले. सर्वत्र रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी होत असताना सदरील रुग्णाला या इंजेक्शनशिवाय बरे करता येऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्यावर शेतकरी कुटुंबाने विश्वास ठेवला आणि इंजेक्शनशिवाय ते पूर्ण बरे झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या. मनाने काहीही ठरवू नका. योग्यवेळी उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो, असेही ते म्हणाले.
येथील प्रा. संजीवकुमार पेद्दावाड (४७) यांना खोकला, ताप अशी लक्षणे जाणवू लागली. त्यांनी तातडीने शहरातील कोविड रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. सीटी स्कॅन स्कोअर २० आला. तेव्हा न घाबरता डॉक्टरांनी दिलेले औषध नियमित घेतले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राहिल्याने ते बरे झाले आहेत.