चाकूर : शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तालुक्यात रविवारी रात्रीपर्यंत ५९१ कोरोनाबाधित ॲक्टिव्ह रुग्ण होते. दरम्यान, आतापर्यंत कोरोनाने ५३ जणांचा बळी घेतला आहे. तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढल्याने चिंता वाढली आहे.
तालुक्यात एकूण १ हजार ९८५ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यातील १ हजार ३४१ जण उपचारानंतर ठणठणीत झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोविड केअर सेंटरमध्ये १२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बाहेर शहरात १३८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. होम आयसोलेशनमध्ये ३२६ रुग्ण आहेत. तालुक्यात सर्वाधिक कोरोनाची लागण लिंबाळवाडीत झाली असून तिथे १६१ पॉझिटिव्ह आहेत. शहरात ९५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत.
येथील सीमा सुरक्षा प्रशिक्षण केंद्रातील बाधितांची नोंद ८० वर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ चापोलीत २६, नळेगाव- २०, सुगाव येथे १३ कोरोना बाधित आहेत. तालुक्यात एकूण ८५ गावे असून त्यातील ६८ गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. घरणीत १९, कवठाळी- १६, कबनसांगवी-१०, आटोळा-१०, आष्टा- १०, लातूर रोड- ९, जानवळ- ९, उजळंब- ७, भाटसांगवी- ६, मोहनाळ- ६, शिवणखेड (बु.)- ६, कुंभेवाडी- ६, डोंग्रज- ५, महाळंगी- ५, भाकरवाडी- ४, जढाळा- ४, देवनगर तांडा- ४, नांदगाव-४, वडवळ (नागनाथ)- ४, वडगाव- ४, रायवाडी- ३, तिवघाळ- ३, अजनसोंडा (बु.)- ३, अलगरवाडी- ३, मांडुरकी- ३, आंबेवाडी- ३, आनंदवाडी- ३, गांजुरवाडी- ३, नायगाव- ३, बावलगाव- २, गांजूर- २, खुर्दळी- २, महाळंग्रा- २, माहुरवाडी- २, महांडोळ-२, रोहिणा- २, सरणवाडी-२, शेळगाव- २, टाकळगाव- २, दापक्याळ- २, झरी (बु.)- २ तर यलमवाडी, वाघोली, तिवटघाळ, शिरनाळ, शंकरवाडी, सावंतवाडी, रामवाडी, तीर्थवाडी, मुरंबी, नागदरवाडी, नागेशवाडी, बोरगाव, बोळेगाव, बोथी, जगळपूर, हणमंतवाडी, हणमंत जवळगा, हटकरवाडी तांडा, कडमुळी, बेलगाव या गावांत प्रत्येकी एक असे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
लसीकरणावर दिला जातोय भर...
तालुक्यातील ४५ वर्षांपुढील नागरिकांनी शासकीय रुग्णालय, उपकेंद्रात जाऊन कोविड लस घ्यावी. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.
लक्षणे जाणवल्यास उपचार घ्या...
कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यास त्यांनी तातडीने नजिकच्या सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. त्यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार करण्यास मदत होते. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. परंतु अनेकजण लक्षणे जाणवत असतानाही तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो.
- डॉ. अर्चना पंडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी.
शासन नियमांचे पालन करा...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने शासन नियमांचे पालन करावे. अनावश्यक घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना चेह-यास मास्कचा लावावा. फिजिकल डिस्टन्स पाळावा. सतत हात धुवावेत.
- डॉ. दीपक लांडे, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय.