लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल टाकताना मापात माप करणाऱ्यांवर वैधमापन विभागाची करडी नजर आहे. मात्र पेट्रोल-डिझेलबाबत होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांबाबत ग्राहक अनभिज्ञ आहेत. परिणामी, जिल्ह्यात वर्षभरात पेट्रोल-डिझेलबाबत वैधमापन शास्त्र विभागाकडे एकही तक्रार दाखल झालेली नाही.
जिल्ह्यात जवळपास १४० पेट्रोलपंप आहेत. दररोज ४ लाख लिटर्स पेट्रोल, तर ११ लाख लिटर्स डिझेलची विक्री होते. कोरोनामुळे ही विक्री २० ते २५ टक्क्यांनी घटली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने थेंबन् थेंब किंमतीचा झाला आहे. काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल टाकताना ग्राहक म्हणावे तसे लक्ष देत नाहीत. परिणामी, त्यांची फसवणूक होते. मात्र तक्रार कोणाकडे करावी, याबाबत माहिती नसल्याने कोणीही आवाज उठवत नाही. त्यामुळे वैधमापन शास्त्र विभाग कार्यान्वित असून, जनजागृतीची गरज आहे.
पेट्रोल पंपावर प्रत्येक ग्राहकाने जागरुक राहणे गरजेचे आहे. काही गैरप्रकार आढळून आल्यास तात्काळ वैधमापन शास्त्र विभागाकडे तक्रार दाखल करता येऊ शकते. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते.
वैधमापन शास्त्र विभागाच्यावतीने वर्षातून एकवेळेस पेट्रोलपंपाची तपासणी होते. वर्षभरात एकही तक्रार नाही. ग्राहकांकडून गर्दीत लवकर पेट्रोल टाकण्याच्या प्रयत्नात झिरो बघण्याकडे दुर्लक्ष होते. याबाबत जागरुकता आवश्यक आहे.
पेट्रोल-डिझेल वगळता इतर प्रकरणांच्या तक्रारी वैधमापन विभागाकडे दाखल आहेत. त्याबाबत कार्यवाही केली जात आहे.
वैधमापन शास्त्र विभागाच्यावतीने वर्षातून एकवेळेस जिल्ह्यातील सर्वच पेट्रोलपंपांची तपासणी केली जाते. ग्राहकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पडताळणीही केली जाते. जिल्ह्यात वर्षभरात पेट्रोल-डिझेलबाबत एकही तक्रार दाखल झालेली नाही.
- सतीश अभंगे, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र विभाग, लातूर/उस्मानाबाद