रस्ते हे विकासाचा मार्ग म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मोठी गावे, शहरे एकमेकांना जोडली जातात. परिणामी, दळणवळण सुरू झाल्याने आर्थिक विकास होण्यास मदत होते. त्यामुळे जळकोट ते बा-हाळी हा रस्ता निर्माण करावा, अशी गेल्या काही वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी जळकोट तालुक्यातील छोटे- मोठे व्यापारी, शेतकऱ्यांकडून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मागणीची दखल घेतली जात नाही. परिणामी, या भागातील नागरिकांसह व्यापाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जळकोट- हळद वाढवणा- रावणकोळा- बा-हाळी हा मार्ग तयार झाल्यास जळकोट, मुक्रमाबाद, देगलूर येथील बाजारपेठा एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे व्यापारवृद्धी होणार आहे.
रावणकोळा ते बा-हाळी हा कच्चा रस्ता असल्याने हा रस्ता नेहमी वाहतुकीसाठी उपयुक्त नाही. बाजारपेठेच्या कामासाठी या मार्गाने ये- जा करणाऱ्या व्यापाऱ्यांसह बा-हाळी येथील साखर कारखान्यास ऊस पाठविणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता तयार झाला नसल्याने अनेकदा मुखेडमार्गे बा-हाळी, मुक्रमाबाद व देगलूरला जावे लागते. हा मार्ग दुप्पट आहे. त्यातून वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे.
राज्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी...
विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी येथील नागरी सत्कार समारंभात या मार्गास तातडीने मंजुरी देऊ, अशी ग्वाही दिली होती. तथापि, दीड वर्ष झाले तरीही त्याची पूर्तता झाली नाही. हा रस्ता झाल्यास जवळच्या मार्गाने वाहतुकीची सोय होणार आहे. शिवाय, आर्थिक उलाढाल वाढणार आहे. त्यामुळे तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष अजिज मोमीन, शंकर वाघमारे, बागवान, सलीम बागवान, बालाजी राचेलवार, बळिराम नामवाड, खलील मोमीन, उस्मान बागवान, खुद्दूस मोमीन, अब्दुल बागवान, हबीब बागवान, सुभाष बनसोडे, बस्वराज सोप्पा यांनी केली आहे.