यावेळी सदस्य राहुल वाघमारे यांनी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत मिळालेल्या १ कोटी ६ लाखांच्या बक्षिसाच्या रकमेचा वापर करण्यासाठी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जी. गंगथडे यांनी मंजुरी असल्याचे सांगितले. तेव्हा अशोक केंद्रे यांनी आजपर्यंत मी तीन- चारदा सभेत बोललो आहे; परंतु सदरील ठराव आपण मांडला नव्हता, असे सांगितले. दरम्यान, ठरावावर अनुमोदक म्हणून नाव असलेले सुरेंद्र गोडभरले यांनीही आपण अनुमोदन दिले नसल्याचे सभेत जाहीर सांगितले. तेव्हा सुरेश लहाने यांनी त्यावेळीचे फुटेज तपासावेत, अशी मागणी केली. दरम्यान, सीईओ गोयल यांनी सदरील ठराव घेतला गेला असल्याचे स्वाक्षरीवरून दिसून येत आहे, असे म्हणाले.
दरम्यान, वाघमारे यांनी बक्षिसाच्या रकमेचा विनियोग योग्य पद्धतीने झाला नाही. जास्तीत जास्त महागड्या वस्तू मागविण्यात आल्या आहेत. त्याचे मी लवकरच पुरावे असल्याचे सांगितले.
सभाच सापडली वादाच्या भोवऱ्यात...
गुरुवारची सभा ही अर्थसंकल्पीय आणि इतर विषयांची होणार असल्याचे अध्यक्ष केंद्रे यांनी सांगितले. तेव्हा अर्थसंकल्पाची सभा वेगळी घेण्याची परंपरा आहे. त्यानुसार विशेष सभा घ्यावी, अशी मागणी माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके व माजी सभापती संजय दाेरवे यांनी केली. जर दोन्ही सभा आज एकत्रित घ्यावयाची असेल तर मागील सभेचे इतिवृत्त न देता त्यापूर्वीच्या सभेचे इतिवृत्त देण्यात आल्याचे तिरुके, दाेरवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
सदस्यांच्या आक्रमकतेमुळे सोमवारी होणार सभा...
गुरुवारच्या सभेवर सदस्य रामचंद्र तिरुके, संजय दोरवे, नारायण आबा लोखंडे, धनंजय देशमुख यांनी आक्षेप घेतला. तेव्हा सीईओ गोयल यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीसाठी प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे. अन्यथा निधी परत जाईल, त्यामुळे सभा लवकर हाेणे आवश्यक असल्याचे सांगितले. सदस्य आक्रमक झाल्यामुळे अखेर अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी ही सभा तहकूब करून सोमवारी दोन्ही सभा एकत्रित घेण्यात येतील, असे सांगितले.