चाकूर तालुक्यातील चापोली येथील सरपंचपद खुला गटातील महिलेसाठी राखीव हाेते. २०१७ मध्ये सरपंचपदी रेखा मद्रेवार यांना संधी मिळाली. सरपंच मद्रेवार आणि ग्रामविकास अधिकारी हणमंत मुरुडकर यांनी विकास कामाच्या नावाखाली गत चार वर्षांखाली आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आराेप ९ ग्रामपंचायत सदस्यांनी लातूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे केला आहे. या व्यवहाराची चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी लेखी तक्रारीद्वारे केली आहे. तक्रार करणाऱ्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य तुकाराम कांबळे, मारोती बोर्डे, बजरंग चाटे, शिवगंगा शेटकर, संजीवनी कदम, निकिता स्वामी, सुनीता स्वामी, मीना कांबळे, अनिकेत कांबळे, तसेच ग्रामस्थ काशिनाथ हाेनराव,समीर देशमुख, शंकुतला शेवाळे यांचा समावेश आहे.
केलेले आराेप बिनबुडाचे...
माझ्यावर केलेले सर्व आराेप हे बिनबुडाचे आहेत. तक्रारीत, आराेपात कुठलेही तथ्य नाही. तक्रारीनुसार चौकशीला प्रारंभ झाला आहे. यातून लवकरच सत्य समाेर येईल, असे सरपंच रेखा मद्रेवार म्हणाल्या.