लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : मार्च २०२०पासून कोरोनाचे संकट अधिक गडद झाले. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली. यातून आर्थिक विवंचना, मानसिक ताणतणाव आणि जगण्याचे प्रश्न गंभीर बनले. कोरोना कालावधीत तब्बल ५५२ नागरिकांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी पोलीस दप्तरी नोंद आहे. गेल्या पाच महिन्यांत १४५ जणांनी आत्महत्या केली आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर आली आहे. मार्च २०२०पासून जवळपास आठ महिने सर्वकाही ठप्प होते. छोटी-छोटी दुकाने, कारखाने आणि छोटी कामेही ठप्प झाल्याने अनेकांवर संकट ओढवले. अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असणाऱ्यांच्या दोनवेळच्या जेवणाची परिस्थिती गंभीर बनली. यामुळे अनेकांना उदरनिर्वाह कसा भागवावा, याचीच चिंता सतावत राहिली. अशा काळात अनेकांनी आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या आत्महत्या टाळण्यासाठी वेळीच आर्थिक, सामाजिक आणि भावनिक आधार देण्याची गरज आहे.
हे दिवसही जातील
कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या हिरावल्या. अनेकांचे व्यवसाय बुडाले. यातून चिंता मात्र वाढली आहे.
अनलॉकमुळे पुन्हा बाजारपेठ सुरू झाली असून, आर्थिक घडी बसेल, ही आशा अनेकांना आहे.
कोरोना नियमांचे पालन करत व्यवसाय करणे हा पर्याय आहे. आता हेही दिवस जातील, असे वाटते.
कुटुंबाने काळजी घेण्याची गरज
घरातील कर्ता व्यक्ती ताणतणावाखाली असेल तर त्याला कुटुंबातील इतर सदस्यांनी मानसिक आधार देण्याची गरज आहे. सध्याची परिस्थिती कठीण असली तरी संयम आणि एकमेकांच्या आधाराने त्यावर मात करता येईल. आत्महत्या हा पर्याय नाही. येणारा दिवस सारखाच नसतो. संकटसमयीही प्रत्येक व्यक्तीने आशावादी आणि प्रयत्नशील असले पाहिजे. यासाठी कुटुंबाच्या आधाराची गरज आहे.
कोरोनाने अनेकांची झोप उडाली, ताणतणाव वाढला
पहिल्या लाटेत मानसिक तणावाखाली जगणाऱ्या रुग्णांची संख्या जेमतेम होती. मात्र, याचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले. कोरोनाने अनेकांची झोप उडाली आहे. ताणतणावही वाढला आहे. याला आर्थिक आणि कौटुंबिक प्रश्न जबाबदार आहेत.
कोरोनाने अर्थचक्रच ठप्प झाल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून व्यसनांचे प्रमाणही वाढले आहे. काहीजण सुटका म्हणून व्यसनाचा आधार घेत आहेत. चिंतेमुळे झोप येत नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या लाटेनंतर नैराश्य येण्याचे प्रमाण मोठे आहे. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा आणि अभ्यासावरून तणाव आहे.