चाकुरातील मुख्य बाजारपेठेत संभाजी लोंढे यांचे टेलरिंग मटेरियलचे होलसेल दुकान आहे. त्यालगत उस्मान शेख यांचे इंटरनेट कॅफे सेंटर आणि जॉबवर्कचे दुकान आहे. रविवारी रात्री संभाजी लोंढे यांचा मुलगा सूरज लोंढे (वय २५) हा दुकानावरील घरी झोपला होता. पहाटेच्यासुमारास तो लघुशंकेसाठी बाहेर आला असता, दुकानातून धूर निघत असल्याचे दिसले. त्यामुळे त्याने दुकानाचे दार उघडताच आतून आगीच्या ज्वाळा त्याच्यावर आल्या. यात त्याचा चेहरा, मान, छाती, दोन्ही हाताचे भाग भाजले. त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या आगीत लोंढे यांच्या दुकानातील दोन मशीन, फर्निचर, टेलरिंगचे साहित्य जळाले. त्यात २२ लाखांचे नुकसान झाले आहे. या दुकानालगतच्या उस्मान शेख यांच्या दुकानातील ४ संगणक संच, ३ प्रिंटर्स, साऊंड सिस्टिम, फर्निचर असे असे एकूण ४ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, हेडकाॅन्स्टेबल हणमंत आरदवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.
पोलिसांनी सायरन वाजविल्याने नागरिक जागे...
आगीमुळे झालेला मोठा आवाज होऊन दुकानाचा दरवाजा रस्त्यावर येऊन पडला होता. याचवेळी शिरूर अनंतपाळ पोलिसांचे वाहन गस्त घालत जात होते. ते ऐकून पोलिसांनी वाहनाचे सायरन वाजवून शेजारील नागरिकांना जागे केले. यावेळी बालाजी सूर्यवंशी, आनंद बेजगमवार, उध्दव पाटील, शाम सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी, नारायण बेजगमवार, उस्मान शेख, अमोल हाळे, संतोष जाधव, नवीद शेख, पोलीस गोरोबा जोशी, परमेश्वर राख, सूर्यकांत कलमे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी अहमदपूर पालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण केले होते.