प्रभाग नऊमध्ये नागरी सुविधेची मागणी
लातूर : शहरातील प्रभाग नऊ मधील वडारवाडा भागात नागरी सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणी शौचालयाची नवीन पाईपलाईन टाकावी, ड्रेनेज लाईनचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी अंकुश टकळहगे, नागनाथ मुद्दे, पप्पू धोत्रे, अजय नाईकवाडे, संतोष यमपुरे, परमेश्वर मुद्दे, मारुती मुद्दे, प्रल्हाद मुद्दे, बबन इरकल, अनिल धोत्रे, दत्ता धोत्रे यांनी शहर महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अभिनव मानव विकास संस्थेचा उपक्रम
लातूर : येथील अभिनव मानव विकास संस्था संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले. यावेळी शुभदा चौकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या मनात नियमित अध्ययन, अभ्यासाबरोबर विविधांगी साहित्याबद्दल आवड निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. याप्रसंगी भरती गोवंडे, मुख्याध्यापक रमाकांत स्वामी, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. संस्थाध्यक्ष डॉ. चेतन सारडा, कमलकिशोर अग्रवाल, जयेश बजाज, अतुल देऊळगावकर यांनी मार्गदर्शन केले.
लेबर कॉलनी परिसरात पाण्याचे नियोजन कोलमडले
लातूर : शहरातील लेबर कॉलनी परिसरात पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याकडे शहर महापालिकेने लक्ष देऊन लेबर कॉलनी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जिजामाता विद्यालयात विज्ञान दिन साजरा
लातूर : एमआयडीसी परिसरातील जिजामाता विद्यालयात विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सलीमा सय्यद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विज्ञान शिक्षक सुभाष म्हेत्रे, देविदास कोल्हे, वैशाली वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. प्रयोगांच्या मांडणीसाठी कलाशिक्षक बाळासाहेब बावणे, गोकुळ मतकंटे, भाग्यशाली गुडे, राजकुमार शिंदे, शंकर पांचाळ, बालाजी साबळे, अप्पासाहेब देशमुख, अर्जुन कांबळे यांनी सहकार्य केले.
मातृभूमी विद्यालयात जंतनाशक गोळ्या वाटप
लातूर : तालुक्यातील भातांगळी येथील मातृभूमी विद्यालयात विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक उत्तम दोरवे,विजय अशोक साबदे, बंकट माणिकराव शिंदे, प्रल्हाद पांडुरंग ढवळे, सुधीर बिराजदार, पांडुरंग जगन्नाथ आकुच, गोविंद अलापुरे, शरणापा आंबुलगे, नेताजी पाटील, नेताजी राजेसाहेब पाटील, महादेव बब्रुवान पुरी, मनिषा स्वामी आदींसह विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती होती.
वीजबिल भरणा करण्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
लातूर : महावितरणच्या लातूर परिमंडळात पावणेदहा लाख वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात वीज बिलाची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणच्या वतीने वीज बिल वसुली मोहीम राबविली जात असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिमंडळात लातूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. ज्यांच्याकडे वीज बिल थकीत आहे, त्या ग्राहकांनी तत्काळ भरणा करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
एसटीच्या माल वाहतूक योजनेला प्रतिसाद
लातूर : कोरोनाच्या काळात उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने माल वाहतूक सेवा सुरू करण्यात आली होती. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, परजिल्ह्यात मालाची वाहतूक केली जात आहे. लातूर विभागातील अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर आणि लातूर आगाराच्या वतीने विशेष माल वाहतूक करणाऱ्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लातूर परिवहन महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
उन्हाचा पारा वाढताच माठ विक्रीसाठी दाखल
लातूर : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे शहरातील बाजारात विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. गंजगोलाई, गूळ मार्केट, दयानंद गेट परिसर, राजीव गांधी चौक परिसरात आकर्षक माठांचे स्टॉल थाटले आहेत. उन्हाळ्यात गरिबांचे फ्रीज म्हणून माठ ओळखले जातात. सध्या मागणी कमी असली तरी आगामी काळात विक्रीत वाढ होईल, असे विक्रेत्यांनी सांगितले.
रेशीम लागवडीसाठी मार्गदर्शन कार्यशाळा
लातूर : जिल्ह्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढावे, यासाठी जिल्हा रेशीम विभागाच्या वतीने विविध गावात मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येत आहे. रेशीम लागवडीचे तंत्रज्ञान, त्याचे फायदे, शासकीय योजना, विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठ आदी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. या मोहिमेत कृषी विभाग सहभागी असून, गावस्तरावर कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
शहरातील बाजारात फळांची आवक वाढली
लातूर : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, शहरातील बाजारात फळांची आवक वाढली आहे. दयानंद गेट परिसर, गंजगोलाई, रयतु बाजार, औसा रोड, रेणापूर नाका परिसरात फळांचे स्टॉल लागले आहे. सध्या सफरचंद, केळी, डाळिंब, चिकू, टरबूज, द्राक्ष, मोसंबी, संत्री आदी फळांची आवक होत असून, दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे फळविक्रेते सलमान बागवान यांनी सांगितले.
बाजार समितीत शेतमालाची आवक
लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली आहे. सोयाबीन, गहू, बाजरी, ज्वारी, चिंच, गूळ, तूर, मूग, हरभरा आदींची आवक होत आहे. सोयाबीनचा दर ५ हजार रुपयांपर्यंत वाढला असल्याने आवक अधिक होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाच्या वतीने मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मुख्य रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी
लातूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे काही ठिकाणी बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शहरातील बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, औसा रोड आदी भागातील काही पथदिवे बंद आहेत. शहर महापालिकेने याकडे तत्काळ लक्ष देऊन बंद असलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.