निलंगा तालुक्यातील खडक उमरगा येथील शेतकरी विष्णू कदम यांनी आपल्या शेतातील एक एकर माळरानावर काजूची लागवड केली आहे. २०१६ मध्ये एका एकरात साधारणपणे दोनशे काजूची वृक्ष लागवड केली आहे. काजूची शेती म्हटले की, पश्चिम महाराष्ट्र डोळ्यासमोर उभा राहतो. मात्र मराठवाड्यात काजूचे उत्पादन घेणे म्हणजे आश्चर्यच आहे. प्रारंभीला ही काजूची झाडे लहान असल्याने, त्यात शेतकरी कदम यांनी आंतरपीकही घेतले. आता झाडे माेठी झाल्याने आंतरपीक घेता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या काजूचे झाडे मोठी आली असून, एका झाडाला दहा किलो काजूचे उत्पादन होणार आहे. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. कोकणात येणारे हे पीक माळरानावर चांगल्याप्रकारे बहरल्याने शेतकरी पाहण्यासाठी गर्दी गरत आहेत. काजू लागवड अत्यंत सोपी असून, बांधालगत आणि माळरानावर कुठेही करता येते. साधारणपणे वर्षामध्ये दोन-तीन फवारणी केल्यानंतर हे पिक बहरते, असेही कदम म्हणाले. निलंगा तालूक्यामध्ये प्रथमच काजूची शेती होत असल्याने शेतकऱ्यांसाठी हा विषय कुतूहलाचा आहे. सोयाबीन आणि उसाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून काजू शेतीकडे वळल्यास माेठे उत्पन्न मिळणार आहे. असेही कृषी तज्ज्ञांनी सांगितले.