औरंगाबादसह मराठवाड्यातील नांदेड व अन्य काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या पूर्व तयारीचा आढावा पाठक यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन बुगड आदी उपस्थित होते.
यावेळी पाठक म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासकीय रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन ठेवाव्यात. गरजू, गरीब रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. होमआयसोलेशनमध्ये असलेेले रुग्ण शासन नियमांचे पालन करीत आहेत की नाहीत, याकडे बारकाईने लक्ष केंद्रित करावे. कोरोना बाधितांची वयोमानानुसार नोंदी ठेऊन विभागणी करावी. ४० ते ६० वयोगटातील बाधितांची दररोज किमान दोनदा आरोग्य तपासणी करावी. ६० वर्षांपुढील कोरोना बाधितांना कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवावे. तसेच शासन नियमाप्रमाणे बिल देऊन उपचार करु इच्छिणा-या खाजगी डॉक्टरांना कोविड सेंटर सुरु करण्यासाठी सहभागी करुन घ्यावे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी कोविड केअर सेंटर अथवा होम आयसोलेशनमध्ये ठेवावे, अशा सूचना केल्या.
एकाचवेळी १० हजार रुग्णांना मिळू शकते सेवा...
जिल्ह्यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोरोना कोविड सेंटर अशा केंद्रातून एकाचवेळी जास्तीत जास्त १० हजार रुग्णांना आरोग्य सेवा मिळू शकते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी दिली. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सुविधांनीयुक्त एक कोरोना वॉर्ड सुरु करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचनाही पाठक यांनी केल्या.