राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ एच अंतर्गत खरोळा फाटा ते पानगाव हा १४.३ किलोमीटर लांबीचा रस्ता कंत्राटदारांनी पूर्ण केला नाही. त्यामुळे या रस्त्याची वेळेवर देखभाल व दुरुस्ती झाली नाही. परिणामी, हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत खराब झाला असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले. चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहने अडकत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी आमदार धिरज देशमुख यांची भेटही घेतली. या सर्व घटनांची दखल घेत आमदार धिरज देशमुख यांनी तातडीने सदरील लांबतील काम संबंधित कंत्राटदाराकडून वगळले जावे, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आणि पाठपुरावाही केला.
आमदार धिरज देशमुख यांची मागणी सरकारने मान्य केली असून जुन्या कंत्राटदाराचे काम मूळ निविदेतून काढून घेण्यास मान्यता दिली. लवकरच नवीन निविदा काढून या रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. आजवर जुन्या निविदा रद्द न झाल्याने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेता येत नव्हते. पण, आता या रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या निविदा मंजूर होण्याआधी या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि वाहनचालक, ग्रामस्थांना होणारा नाहक त्रास टाळण्यासाठी या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशा सूचना आमदार धिरज देशमुख यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.