कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत गुरुवारपासून दिवसाही संचारबंदी लागू केली आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी रस्त्यावर उतरल्याचे गुरुवारी सकाळी पहावयास मिळाले. शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे हे थांबले होते. तसेच आझाद चौक, महात्मा बसवेश्वर चौक, स्वा. सावरकर चौकात प्रशासकीय अधिकारी थांबून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करीत होते. तसेच त्यांना घराबाहेर पडण्याचे कारण विचारले जात होते.
तेव्हा काहींनी मुलगा रडत आहे, बिस्किट पुडा आणायचा आहे, तर काहींनी घरात भाजीपाला नसल्याने ताटात वरणच येत आहे. त्यामुळे भाजीपाला घेऊन जायचा आहे. काहींनी मेडिकलवर जात आहे. शेताला जायचे आहे, अशी कारणे सांगत होते. विशेष म्हणजे, काहींनी तर नातेवाईक आले आहेत की नाहीत, हे पाहण्यासाठी बसस्थानकावर जात आहे, तर काहींनी रस्त्यावर किती नागरिक आहेत, हे पाहण्यासाठी आल्याचे सांगितले. नागरिकांची अशी कारणे ऐकून प्रशासनही थक्क झाले. योग्य कारण नसलेल्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई...
बुधवारी रात्री ८ वा. पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने हे निर्देश दिले आहेत. शुक्रवारपासून कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. जर आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकानदारांनीही दुकाने उघडू नयेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.