येथील नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागासाठी एक महिन्यापूर्वी दोन घंटागाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही या घंटागाड्या सुरू करण्यात आल्या नाहीत. गत महिनाभरापासून या घंटागाड्या जाग्यावरच थांबून आहेत. घंटागाड्यांना मुहूर्त कधी मिळणार, अशी चर्चा नागरिकांत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण - २०२१ अभियानासाठी जळकोट नगरपंचायतीने कंबर कसली असून, नगरपंचायतीच्या ताफ्यात आता गत महिन्यात दोन घंटागाड्यांचा समावेश झाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत निधीतून या घंटागाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. जळकोट शहरात गल्लोगल्ली जाऊन या घंटागाड्यांच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा संकलित करण्यात येणार आहे. परिणामी, ज्या ठिकाणी कचरा संकलित करणारे ट्रॅक्टर जात नाही, तेथे या घंटा गाड्यांच्या माध्यमातून कचऱ्याचे संकलन करणे सुलभ होणार आहे. जवळपास दहा ते बारा लाख रुपयांची किमती असलेल्या या घंटागाड्या जाग्यावरच थांबून आहेत. जळकोट नगरपंचायतीच्या हद्दीतील कचरा संकलनाचे काम गतीने होण्यास घंटा गाड्यामुळे मदत होणार आहे.
मात्र, घंटागाड्या सुरू कधी हाेणार, हाच सवाल आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. ‘नाक डोळे छान..रंग गोरा गोरा पान...कोणीतरी न्या हो मला...फिरवायला...’ असे म्हणण्याची वेळ जाग्यावर थांबलेल्या घंटागाडयांवर आली आहे.