किनगाव : रस्त्यावर लावलेली दुचाकी काढा, असे म्हटल्याने आरोपीने बेकायदा जमाव जमवून फिर्यादीला कुऱ्हाडीने व रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथे सोमवारी घडली. याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राम विठ्ठल कदम (रा. कोपरा) हे कारने घरी जात असताना, त्यांनी रस्त्यावर लावलेली दुचाकी काढ, असे म्हटल्याने शिवाजी उर्फ बालाजी गणपती कदम, प्रल्हाद गणपती कदम, गणपती नामदेव कदम, कमलबाई गणपती कदम, शिवाजी व्यंकटी पिटाळे (रा. सर्व कोपरा) यांनी संगनमत करून फिर्यादीच्या घरासमोर येऊन गोंधळ घालत दगडफेक केली तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने मारून डोके फोडले. यावेळी लोखंडी रॉडने मारहाणही केली. हे भांडण सोडविण्यासाठी ग्रामस्थ आले असता, तुमचा काय संबंध, असे म्हणून त्यांनाही धमकावले. याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील एकाला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन अन्सापुरे हे करत आहेत.