शेतात काम करीत असताना मारहाण
लातूर : बसवंतपूर येथील गट नं. ३८ मधील वहिवाटीच्या शेतात काम करीत असताना ‘तू इकडे कसे काय आलास’ असे म्हणत मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी श्रीराम अर्जुनराव मदने (वय ५५, रा. बसवंतपूर) हे आपल्या वहिवाटीच्या शेतात काम करीत असताना तू इकडे कसे काय आलास, यापूर्वी तुला सांगितले होते की इकडे आलास तर तुझे हात-पाय तोडीन, असे म्हणत हातातील कुऱ्हाडीने फिर्यादीच्या डोक्यात मारले. फिर्यादीचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही काठीने डोक्यात मारून जखमी करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी श्रीराम अर्जुने यांच्या तक्रारीवरून लखन एकनाथ मदने व सोबत असलेले चारजण (सर्व रा. बसवंतपूर, ता. लातूर) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. देशमुख करीत आहेत.