औसा तालुक्यातील भादा येथील उच्चशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून आधार प्रतिष्ठानची स्थापना केली. गरजूंना मदत करीत त्यांना उभारी देण्याचा उद्देश ठेवून प्रतिष्ठानची वाटचाल सुरू आहे. दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे प्रत्येकजण संकटाशी मुकाबला करीत आहे. अशा परिस्थितीत काही जणांवर उपासमारीची वेळ आली. तेव्हा आधार प्रतिष्ठानकडून विविध सामाजिक उपक्रमातून मदत देण्यात येत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मास्क, सॅनिटायझर व पुस्तकांचे वाटप केले. दरम्यान, जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा बसवेश्वर जयंती व रमजान ईदनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात १२५ जणांनी रक्तदान केले. कोरोनामुळे टाळेबंदीत रोजगार गमवावा लागलेल्या गरजू कुटुंबांना, निराधार व्यक्ती, विधवा महिलांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. लातुरातील काही भाग, पाखरसांगवी, औसा शहर व तालुक्यातील हळदुर्ग आणि भादा येथील गरजू कुटुंबांना मदत देण्यात आली.
दरम्यान, कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे आधार प्रतिष्ठानचे रवि पाटील यांनी सांगितले. या प्रतिष्ठानमध्ये रियाज खोजे, प्रशांत पाटील, दीपक मानधणे, लखन लटुरे, गोरख बनसोडे, बालाजी उबाळे, मनोज उबाळे आदींचा समावेश आहे.