गुबाळ-आशिव हा रस्ता दोन जिल्ह्यांना जोडणारा असल्याने सतत या रस्त्यावर वाहतूक असते, परंतु या मार्गाची दुरवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे, तर प्रवाशांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. गुबाळ-आशिव रस्ता हा १८ ते २० किमीचा आहे. हा रस्ता संपूर्ण खड्डेमय झाल्याने खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनांचे अपघात होत आहेत, तसेच काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, वाहनचालकांना समोरून येणारे वाहन सहजरीत्या दिसत नाही. त्यामुळे अपघात होत आहेत.
माकणी ते किल्लारी या मार्गावर माकणी तलावातील जलवाहिनीचे काम नुकतेच झाले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यात खोदकाम करण्यात आले आहे. ते व्यवस्थितपणे बुजविण्यात आले नसल्याने, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदरील रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गुबाळ, नांदुर्गा, सारणी येथील प्रवाशी व वाहन चालकांतून होत आहे.