जिल्ह्यातील लातूरनंतर सीमावर्ती भागातील मोठी बाजारपेठ उदगीरची आहे. तीन राज्यांच्या सीमेवरील आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागांतून येथील बाजारपेठेत शेतीमालाची आवक होते. शेतमाल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने येथे शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योगही सुरू आहेत. शेतमाल खरेदीसाठी स्पर्धा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दरही मिळतो. त्यामुळे येथे दररोज कोट्यवधींची उलाढाल होत असते. त्यातून बाजार समितीलाही मोठे उत्पन्न मिळते.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विविध बाजारपेठा बंद आहेत. कापड मार्केट, सराफ लाईन अशी दुकाने बंद आहेत. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून शासनाने फिजिकल डिस्टन्ससह अन्य नियम व अटी लागू करून व्यवहारास परवानगी दिली आहे. परंतु, येथील मोंढ्यात नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. सकाळी सौद्याच्यावेळी तर मोठी गर्दी असते. एका सौदात बाजार समितीचा एकच कर्मचारी असतो. हरभरा, तूर, सोयाबीनचा सौदा वेगवेगळ्या ठिकाणांहून निघत असला तरी व्यापाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे.
रात्री १० वा. पर्यंत काम...
मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात व्यवहार करतेवेळी एका दिवशी एकाच शेतमालाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार होत असे. त्यामुळे सर्व कामे वेळेवर होत होती. यंदा जरी रात्री ८ वा. पर्यंत काम करण्यास मुभा दिली असली तरी प्रत्यक्षात रात्री १० ते ११ वाजेपर्यंत काम सुरू असते. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, बाजार समितीच्या सचिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु, तो होऊ शकला नाही.
लॉकडाऊनच्या भीतीने आवक...
शासन अचानक लॉकडाऊन करेल, या भीतीपोटी शेतकरी आपला शेतमाल घेऊन येत आहेत. त्याचबरोबर शेतमालाचे दर वाढल्याने शुक्रवारी आवक वाढली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम पाळून व्यवहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- संभाजी घोगरे, अध्यक्ष, आडत असो. उदगीर.