जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर
लातूर : जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ अंतर्गत औसा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला. आशिव, हरीजवळगा, सारणी, दापेगाव, बोरफळ, खरोसा, औसा तांडा, हाडोळी, चलबुर्गा, वाघोली, देवंग्रा, बानेगाव, माळकोंडजी, याकतपूर, हणमंतवाडी, मंगरुळ, महादेववाडी आदी गावांच्या रस्त्यासाठी तसेच स्मशानभूमीच्या शेडसाठी निधी मंजूर झाला असल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी सांगितले.
सेवाभावी संस्थेच्या वतीने अन्नदान
लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात धर्मवीर औदुंबर पाटील बट्टेवार सेवाभावी संस्थेच्या वतीने अन्नदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अविनाश बट्टेवार, ईश्वर बट्टेवार यांची उपस्थिती होती.
आष्टा मोड येथून दुचाकीची चोरी
लातूर : आष्टा मोड (ता. चाकूर) येथे पार्किंग केलेल्या बीपी १० ईजे ४७३० या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत बळीराम तुकाराम शिंदे (रा. बोरगाव खु., ता. जळकोट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोना. मामडगे करीत आहेत.
मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण
लातूर : संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व त्याच्या मित्रास फोनवरून बोलावून मारहाण केल्याची घटना निलंगा शहरातील हाडगा नाका येथे घडली. लाथा-बुक्क्यांनी मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली, असे किशोर बस्वराज स्वामी (रा. शिवाजीनगर, निलंगा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पृथ्वीराज निंबाळकर व अन्य पाच जणांविरुद्ध (सर्व रा. दापका वेस, निलंगा) निलंगा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोना. पडिले करीत आहेत.