अहमदपूर तालुक्यातील अंधोरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत अंधोरी, ढाळेगाव, खंडाळी, उजना, गंगा हिप्परगा, रुद्धा गावांचा समावेश आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गंगा हिप्परगा येथे आरोग्य सेविकेचे पद गत दाेन वर्षांपासून रिक्त आहे. खंडाळी येथील आरोग्य सेविका नांदेड येथे गेल्या ३ महिन्यांपासून प्रशिक्षणासाठी गेल्या आहेत. आरोग्य सहायिका प्रसूती रजेवर गेल्या आहेत. तर उजना आरोग्य केंद्रात सेवकाची जागा रिक्त आहे. आरोग्य सहायक पुरुषांची दाेन पदे रिक्त आहेत. सेवकांची २ पदे रिक्त आहेत. उजना येथील कंत्राटी आरोग्य सेविका वैद्यकीय रजेवर असल्याने कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये अंधोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. यातून आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ होत आहे.
रिक्त पदे भरण्यात येतील...
अहमदपूर तालुक्यातील अंधोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांच्या आराेग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. येथील रिक्त आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांबाबत जिल्हा आरोग्य विभागाकडे वारंवार कळविण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांची सातत्याने मागणी करण्यात आली आहे. लवकरच कर्मचारी भरती झाल्यानंतर रिक्त पदे भरण्यात येईल, असे अहमदपूर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील दासरे म्हणाले.