शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी २०२१ या वर्षाच्या शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. १५ एप्रिलपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करावेत. महाडीबीटी पोर्टल ३ डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आले आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती निर्वाह भत्ता या सर्व शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरून मंजुरीसाठी लॉगीनवर पाठवावे. महाविद्यालयात शिष्यवृत्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अर्जांची अचूक पडताळणी करून मंजुरीसाठी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात १५ एप्रिलपर्यंत सादर करावेत.