यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, उदगीरमध्ये बेडची संख्या वाढविण्याची गरज आहे. ऑक्सिजन, औषधी साठा कमी पडत असल्याने उदगीर आणि जळकोट या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभा करावा लागेल. आठवडी बाजार भरतात, अशा गावांत लसीकरण मोहीम राबवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले, कोविड प्रादुर्भाव दुपटीने वाढण्याचा कालावधी १५ दिवसांवरून ८ दिवसांवर आला आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे लागेल. खाजगी रुग्णालयात जेवढे ऑक्सिजन बेड आहेत, त्यापैकी ८० टक्के बेड आरक्षित करावे लागतील. लातूर, उदगीरसाठी स्वतंत्र जम्बो कोविड सेंटरची आवश्यकता आहे. दरम्यान, आ. धीरज देशमुख, आ. विक्रम काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांनीही सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, डॉ. हरिदास आदींची उपस्थिती होती.