अहमदपूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वेगवेगळ्या सभा, समारंभ आणि धार्मिक कार्यक्रमामुळे कोराेनाचा कहर हाेत आहे. त्यानुसार प्रशासनाने तातडीची बैठक घेत बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांच्या चाचण्यावर भर दिला आहे. संपर्कात आलेल्या बाधित रुग्णांची टक्केवारी २१ च्या घरात आहे. त्याचबराेबर अहमदपूर तालुक्यात रविवारअखेरपर्यंत ५०७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ३९८ रुग्ण होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या ३९ आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण १९ हजार २०२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रविवारअखेर अहमदपूर शहरात ४३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ग्रामीण भागात १५ रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अहमदपूर शहरात २६ आणि ग्रामीण भागातील ४३ रुग्णांचा समावेश आहे. अहमदपूर तालुक्याचा रिकव्हरी रेट ८० टक्क्यांवर आहे. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची संख्या माेठी आहे. त्यासाठी शाेधमाेहिमेला गती देण्यात आली आहे. बाधित रुग्णांना येथील काेविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे म्हणाले.
अहमदपूर तालुक्यात बाधितांच्या संपर्कातील २१ टक्के रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:18 IST