चाकूर तालुक्यातील तिवटघाळ येथील प्रमिलाताई बद्दे यांच्या गाईच्या गोठ्यात शुक्रवारी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष चोले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाणे यांची उपस्थिती होती.
यावेळी सभापती गोविंद चिलकुरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचा विविध योजनांमध्ये समावेश करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकरी, पशुपालकांच्या कामाची ओळख यातून समिती सदस्यांना होईल. त्याचा फायदा शेतकरी, पशुपालकांना होईल. मनरेगाच्या माध्यमातून फळबाग लागवड, शेततळे यासह शेतकऱ्यांना गायींचे गोठे देणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी रेशीम लागवड व पोखरा योजनेमधून घेण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सांगितली.
पशुवैद्यकीय दवाखान्यांचे सक्षमीकरण...
सीईओ अभिनव गोयल म्हणाले, जिल्हा परिषदेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा वाढविण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांचे सक्षमीकरण केले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या दवाखान्यातही राज्यस्तरीय दवाखान्याप्रमाणे सोयी- सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. देवणी गोवंश संगोपनासाठी प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषदेने देवणी गोवंश संवर्धन ही नवीन योजना प्रस्तावित केली आहे. कृषी व पशुसंवर्धन हे दोन्ही व्यवसाय एकमेकास पूरक असून शेतकऱ्यांनी शेतीबरोबर पशुपालन, मधुमक्षिका पालन असे व्यवसाय केल्यास व बायोगॅसचा वापर केल्यास शेतीमध्ये सुधारणा होऊ शकते.