लातूर : कोरोनाचा संसर्ग वाढलेला असताना अनेक ठिकाणी विलगीकरण कक्षात कंत्राटी तत्वावर डाॅक्टर, नर्सेस, लॅब टेक्निशियन, वाॅर्डबाॅय आदींची नेमणूक करण्यात आली होती. कोरोनाचा प्रभाव कमी होताच सदरील कर्मचाऱ्यांची सेवा थांबविण्यात आली. त्यामुळे उपासमारीची वेळ आली असून, पुन्हा सेवेत घ्यावे, या मागणीसाठी सदर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. हंगामी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम घ्यावे. कोरोना काळात बाधित रुग्णांची आम्ही सेवा केली. रुग्णसंख्या घटताच आमचे काम थांबविण्यात आल्याने उपासमारीची वेळ आली आहे. जोपर्यंत प्रशासन आमची दखल घेणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेच्यावतीने निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आंदोलनात सुकेश गायकवाड, योगेश स्वामी, ज्ञानेश्वर काळे, नीलेश हंकारे आदींचा समावेश आहे. कामावरून कमी करण्यात आलेल्या हंगामी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.