शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुभाजकाची दुरवस्था
लातूर : शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी दुभाजकांमध्ये कचरा टाकला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. औसा रोड, बार्शी रोड, अंबेजोगाई रोड आदी भागातील दुभाजकांमध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे शहर महापालिकेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
लातूर : शहरापासून नजीक असलेल्या हरंगूळ नवीन वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे असल्याने अनेकदा किरकोळ अपघात होत आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी होत आहे.
बालदिन सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा
लातूर : तालुकास्तरावर बालदिन सप्ताह साजरा करण्यात आला होता. यामध्ये ऑनलाइन भाषण, पत्रलेखन, नाट्यछटा या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये प्रणाली कदम, प्रांजल वाकसे, शुभ्रा दलाल, शंकर आळने, वृंदावनी सूर्यवंशी, सायली निर्मले, ममता आडे, श्रुती बिराजदार, साक्षी पवार या विद्यार्थिनींनी यश मिळविले. यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी आदींसह शिक्षक, पालकांनी कौतुक केले आहे.
वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम
लातूर : शहर वाहतूक शाखेच्या वतीने कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरविरोधात विशेष मोहीम राबविली जात आहे. शहरातील रेणापूर नाका, गंजगोलाई, राजीव गांधी चौक परिसर, मिनी मार्केट, दयानंद गेट परिसर, पाच नंबर चौक आदी भागात विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आगामी काळात ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.
तंबाखूमुक्त शाळा उपक्रमाची अंमलबजावणी
लातूर : सलाम मुंबई फाउंडेशन आणि शिक्षण विभागाच्या वतीने तंबाखूमुक्त शाळा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. नव्या नियमानुसार शाळांना नऊ निकषांची पूर्तता करावी लागणार आहे. लातूर तालुक्यातील १०० हून अधिक शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. तंबाखूमुक्त झालेल्या शाळेला दोन वर्षांसाठी प्रमाणपत्र दिले जात आहे. सर्वच तालुक्यातील शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात असल्याचे चित्र आहे.
शहरातील बाजारात भाजीपाल्याची आवक
लातूर : उन्हाचा पारा वाढत असून, रसाळ फळे, भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. शहरातील बाजारात दररोज ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक होत आहे. आवक अधिक असल्याने काही प्रमाणात दरही कमी झाले आहेत. रात्री ८ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी असल्याने सायंकाळी ६ वाजेनंतर बाजारात गर्दी होत आहे. भाजीपाला व्यावसायिक कोरोनाच्या नियमांचे पालन करीत भाजीपाला विक्री करीत आहेत.