अहमदपूर : तालुक्यात काेरोनाचा संसर्ग वाढत असताना होम क्वाॅरंटाईन असलेल्यांपैकी काहीजण नियमांचे उल्लंघन करीत घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गुरुवारी प्रशासनाच्या वतीने गृहविलगीकरणातील बाधितांचा शोध घेण्यात आला. तालुक्यातील ३०७ पैकी १८ जणांशी मोबाईलवरून संवाद होत नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीन निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. दरम्यान, गृहविलगीकरणातील काही जण नियमांचे उल्लंघन करीत बाहेर फिरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढून आरोग्य विभागावर अधिक ताण पडत आहे. हा संसर्ग कमी करण्यासाठी आणि गृहविलगीकरणातील बाधित व्यक्ती घरीच आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी गुरुवारी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार तपासणी मोहीम राबविण्यात आली.
तालुक्यात एकूण ३५७ कोरोनाबाधित आहेत. त्यातील ३३ संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर ३०७ जण गृहविलगीकरणात आहेत. उर्वरित बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारच्या तपासणीत गृहविलगीकरणातील १८ बाधितांचा शोध लागला नाही. सदरील रुग्णांनी दिलेला मोबाईल क्रमांक लागत नाही. त्यामुळे प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे. दरम्यान, सदरील बाधितांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे.
त्या बाधितांचा शोध सुरू
गृहविलगीकरणातील ३०७ पैकी १८ जणांनी दिलेला मोबाईल क्रमांक लागत नाही. त्यामुळे तो चुकीचा अथवा कव्हरेज क्षेत्राबाहेर दाखवित आहे. या बाधितांचा शोध घेण्यासाठी पथक कार्यरत आहे. त्यांचा शोध घेऊन लवकरच त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सरपंचासह ६ शासकीय कर्मचाऱ्यांना नोटीस...
अहमदपूर तालुक्यातील मोघा येथे विनापरवाना कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नियमापेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तेथील सरपंचासह सहा शासकीय कर्मचाऱ्यांना तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मोघा येथील एका धार्मिक कार्यक्रमात फिजिकल डिस्टन्स न राखता ३०० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्याचे उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या पथकास आढळून आले. सदरील कार्यक्रमाची माहिती कार्यालयात न दिल्याने सरपंचासह तलाठी, ग्रामसेवक, पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस पाटील, कोतवाल व कृषी सहाय्यकांना नोटीस बजावण्यात आली आहे. २४ तासांत खुलासा सादर करण्याचे कळविण्यात आले आहे. समाधानकारक उत्तर न आल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे.
विनापरवाना घेण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या व्यक्तींची माहिती मुख्य कार्यालयास अवगत करणे गरजेचे आहे. यात कसूर केल्यास कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे. काही नागरिक व शासकीय कर्मचारी आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.