राजर्षी शाहू महाविद्यालयात पंडित नारायण यांचा सत्कार
लातूर : येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील गणित विषयाचे प्रा.पंडित रविकांत नारायण सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ.ए.जे. राजू, प्रा.सोमदेव शिंदे, प्रा.एस.एन. शिंदे, प्रा.संजय बिराजदार, डॉ.ओमप्रकाश शहापूरकर, डॉ.महेश वावरे, प्रा.शिवशंकर पटवारी, प्रा.नानासाहेब काळे, जगन्नाथ क्षीरसागर आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. गणितासारख्या कठीण विषयात प्रा.पंडित हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते, असे विचार प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांनी व्यक्त केले.
प्रणाली कदम हिचे वक्तृत्व स्पर्धेत यश
लातूर : बाल दिन सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत औसा तालुक्यातील वानवडा येथील जि.प. शाळेची विद्यार्थिनी प्रणाली दीपक कदम हिने पहिली ते दुसरी गटात तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी, निवृत्ती जाधव केंद्र प्रमुख शारवले, सरपंच शहाजी पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद तळेकर, मुख्याध्यापक जगन्नाथ पांढरे यांनी कौतुक केले. प्रणाली कदम हिला शिक्षिका शोभा माने यांचे मार्गदर्शन लाभले.
कुस्ती महा-वीर स्पर्धा कोरोनामुळे रद्द
लातूर : दरवर्षी होणारी राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड स्मृति राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा २०२१ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. लातूर तालुक्यातील रुई येथे ही स्पर्धा दरवर्षी होत असते. यंदा राज्यासह लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ कराड व संचालक आ. रमेश कराड यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील तापमानात झाली वाढ
लातूर : गेल्या आठवडाभरापासून लातूर शहरासह जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे. ३९ अंश सेल्सिअसवर तापमान पोहोचले असून, उन्हाचा चटका वाढला असल्याने, दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. अनेकांनी नवीन कुलर खरेदीला, तसेच दुरुस्तीला पसंती दिली आहे. लातूर शहरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन कुलरची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.