कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. बुधवारी रात्री ८ वाजतापासून संचारबंदी करण्यात आली आहे. किराणा, भाजीपाला, आडत, खत, मेडिकल दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, विनामास्क व अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी औराद शहाजानी पोलीस ठाणे व ग्रामपंचायतच्या वतीने पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाने शुक्रवारी शहरातील बाजारपेठेतील दुकानांना भेटी दिल्या असता ६७ व्यापारी व ग्राहक विनामास्क व्यवहार करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, पीएसआय गाैंड, ग्रामविकास अधिकारी धनाजी धनासुरे यांच्या पथकाने ही दंडात्मक कारवाई करून समज दिली.
सोयीसुविधांची पाहणी...
निलंग्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या पथकाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन उपलब्ध सुविधांची पाहणी केली तसेच डॉक्टरांना सूचना केल्या. ग्रामपंचायत व पाेलिसांचे एक संयुक्त पथक तयार करून अनावश्यक गर्दी व विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान, दोन दिवसापासून केंद्रावर लस पुरवठा नसल्याने लसीकरण बंद करण्यात आले आहे. आरटीपीसीआर किट संपल्या आहेत, त्यामुळे ट्रेसिंग करणे कठीण झाले आहे. शहरात ७८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.