नगरपंचायतीतील कक्ष अधिकारी बी.बी. ठाकूर, प्रमोद कास्टेवाड, बालाजी स्वामी, प्रसन्ना चाकूरकर, बळीराम शिंदे, सतीश कांबळे यांच्या पथकाने शहरातील दुकानांची पाहणी केली. शहरातील जुन्या बसस्थानकाजवळील वॉइन शॉपीमधून दारूची सर्रास विक्री सुरू होती. एका स्टेशनरी दुकानाला किराणा दुकानाचा फलक लावून त्यातून स्टेशनरी साहित्याची विक्री सुरू होती. बोथी रस्त्यावरील एका किराणा दुकानात फिजिकल डिस्टन्स न पाळता ग्राहक सेवा सुरू होती. इलेक्ट्रिक दुकान सुरू होते. जिल्हा परिषद शाळेनजीकच्या कापड दुकानातून ग्राहकांना कपडे विक्री सुरू होती. तसेच शहरात विनामास्क फिरणा-यांविरुद्ध या पथकाने दंडात्मक कारवाई केली. त्यातून २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी रविवारी नगरपंचायत आणि पोलीस यंत्रणेला लॉकडाऊनकाळात नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
शहरातील कोरोनाचा वाढता आलेख रोखण्यासाठी नगरपंचायतीकडून यापुढेही आणखीन कडक कारवाई केली जाणार आहे. वेळप्रसंगी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी सांगितले.