लातूर : लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन साडेसात महिने उलटले तरी आतापर्यंत जिल्ह्यात ९ लाख ६० हजार ६५८ दोन्ही मिळून डोसचा वापर झाला आहे. यात ७ लाख ७ हजार २९ जणांनी पहिला डोस घेतला असून, दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या २ लाख ५३ हजार ६२९ इतकी आहे. आजघडीला ९१ हजार ५०० जणांची दुसरा डोस घेण्याची मुदत संपली आहे. कधी लसीचा तुटवडा तर कधी लाभार्थ्यांकडून लस घेण्यास विलंब होत आहे. त्यामुळेच ९१ हजार ५०० जण दुसरा डोस घेण्यास मागे राहिले आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जिल्ह्यात शासकीय व खासगी केंद्रांवर सोय करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि लातूर शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. दररोज केंद्रनिहाय नियोजन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाते. कोणत्या केंद्रावर कोणती लस आणि कोणता डोस दिला जाणार आहे, याबाबतची माहिती दिली जाते. गेल्या साडेसात महिन्यांपासून अखंडपणे लसीकरणाची मोहीम सुरू आहे. प्रारंभीच्या काळात लसीचा तुटवडा होता, मात्र आता मुबलक प्रमाणात लस उपलब्ध झाली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पूर्ण फायदा होण्यासाठी दोन्ही डोस आवश्यक
पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरच पूर्ण क्षमतेने प्रतिकारशक्ती मिळते. त्यामुळे दुसरा डोस घेणे आवश्यक आहे.
ज्यांची मुदत संपली आहे त्यांनी तत्काळ नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
नेमकी अडचण काय?
लसीकरण मोहिमेच्या प्रारंभी मागणीप्रमाणे लसीचा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे कधी-कधी लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुबलक प्रमाणात पुरवठा होत आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी उपलब्ध आहेत, त्यामुळे अडचण नाही.
कोट....
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. अनुक्रमे ज्यांचे पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत व ज्यांचे २८ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांनी नजीकच्या लसीकरण केंद्रात जाऊन आपला दुसरा डोस घ्यावा. लस जिल्ह्यात उपलब्ध आहे.