महावितरणच्या वतीने मार्चअखेर वसुली मोहीम जोरदार सुरू केली आहे. तालुक्यातील ७ हजार ९०० कृषी विद्युत पंप ग्राहकांपैकी ८०० शेतकऱ्यांनी अंशतः रक्कम भरली आहे. ११६ शेतकऱ्यांनी पूर्ण रक्कम भरून बेबाकी प्रमाणपत्र मिळविले आहे. त्यातच कृषिपंपाच्या थकबाकीचा आकडा ५९ कोटींवर पोहोचला आहे. घरगुती थकबाकीही कमी नाही. तालुक्यातील घरगुती, व्यापारी व औद्योगिक असे एकूण २१ हजार विद्युत ग्राहक असून त्यांची ७ कोटी ५० लाख रुपये थकबाकी आहे. तसेच अत्यावश्यक असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेमध्ये अहमदपूर लिंबोटी पाणीपुरवठा योजनेची साडेतीन कोटी, तर शहरातील स्थानिक व दिवाबत्तीची चार कोटींची थकबाकी आहे. दर महिन्याला २५ लाख रुपये विद्युत देयके नगरपालिका नियमितपणे भरत आहे. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या ११६ गावांतील १ कोटी ९१ लाख रुपये शिल्लक असून त्यांच्या वसुलीसाठी महावितरण प्रयत्नशील आहे.
सवलत योजनेचा लाभ घ्यावा
महावितरणच्या वतीने २०१७ पर्यंत थकबाकी असलेल्या ग्राहकांना पन्नास टक्के वीज बिलात सवलत देण्यात येत आहे. त्याचा कृषिपंपधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अभियंता पी.व्ही. काळे यांनी केले आहे.