अहमदपूर तालुक्यात सध्या १ हजार २५ ॲक्टिव्ह कोरोना बाधित आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण अहमदपूर शहरात असून सोमवारी एकाच दिवसात ९२ पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत एकूण ६१० बाधित अहमदपुरात झाले आहेत. तालुक्यात एकूण ८०९ जण गृहविलगीकरणात आहेत. तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे १६० कोरोना बाधित, हडोळतीत ७५, अंधोरी - ७०, सताळा धानोरा- ७०, हिप्परगा- ५८, किनगावात ४४ असे रुग्ण आहेत. त्यामुळे मोठ्या गावांतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
दरम्यान, उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात १० खाटांचा एक कक्ष तसेच दोन खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी १० खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ही रुग्णालये सुरू झाली असली तरी तिथे आवश्यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन सध्या उपलब्ध नाही. तसेच ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. उदगीर व लातूर येथील रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्यामुळे बहुतांश रुग्ण अहमदपूर शहरातील कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होत असून त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा पुरवण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत १० हजार ९०० रॅपिट चाचण्या...
तालुक्यात आतापर्यंत १० हजार ९०० रॅपिड ॲन्टीजन चाचण्या झाल्या आहेत. तसेच ११ हजाराच्या जवळपास आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्याने बाधितांची संख्याही वाढली आहे. विकेंड लॉकडाऊननंतर शहरात ग्रामीण भागातील नागरिकांनी गर्दी केली होती. अत्यावश्यक सेवेच्या दुकानांवर एकच गर्दी झाली होती. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत काही काळ धावपळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवून सुरळीत केले. तसेच उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे यांनी ग्रामीण भागास भेटी देऊन रुग्णांच्या उपचारासाठी सूचना केल्या. आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांचे बाधितांवर लक्ष राहणार आहे. त्यासाठी आरोग्यसेवक चंद्रकांत पवार, राजेंद्र गुंडरे, प्रमोद इंगळे, मनोज कपिगिरे, नागनाथ वाघमारे, संजय नाळापुरे आदी परिश्रम घेत आहेत.