शिरूर अनंतपाळ : येथील पाटबंधारे उपविभाग क्र. ६ अंतर्गंत लहान- मोठ्या १६ तलावांचा समावेश आहे. यंदा सर्वच तलाव शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे लाभ क्षेत्रातील गावांत रबी हंगामाचे सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान, मोजणी पथकाकडून सिंचन क्षेत्राची मोजणी पूर्ण झाली आहे. ५ हजार २४ हेक्टर्स एवढ्या सिंचन क्षेत्राची नोंद झाली आहे.
शिरूर अनंतपाळ पाटबंधारे उपविभागातंर्गत उदगीर, देवणी, शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यांचा समावेश असून, १६ लहान- मोठे तलाव आहेत. मागील तीन- चार वर्षांपासून अवर्षण झाल्यामुळे सिंचन क्षेत्रात मोठी घट झाली होती. परंतु, गत पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने उपविभागातंर्गतचे सर्वच लहान- मोठे तलाव शंभर टक्के भरले होते. परिणामी सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे उपविभागातंर्गत सिंचन क्षेत्राच्या मोजणीसाठी उपविभागीय अभियंता गोरख जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नियुक्त करण्यात आले होते. यामध्ये प्रभाकर पाटील, राहुल जाधव, निटुरे, आर.सी. पांचाळ, गोविंद मोरे, चंद्रहास माने, बसवराज बिराजदार, कुमार पाटील, सतीश कदम, विश्वनाथ महाके, सुरवसे, डी.जी. मोरे यांचा समावेश आहे. या पथकाने पाणीपट्टी आकारणी करण्यासाठी नुकतीच मोजणी पूर्ण केली असून, प्रकल्प शाखानिहाय सिंचन क्षेत्राची निश्चिती करण्यात आली आहे. सन २०२०- २१ या वर्षाच्या रबी हंगामात ५ हजार २४ हेक्टर्स जमीन सिंचनाखाली आली असल्याची माहिती पाटबंधारे वरिष्ठ विभागास कळविण्यात आली आहे.
३ हजार ६१७ हेक्टर्सवर रबी...
पाटबंधारे उपविभागातंर्गत ३ मध्यम प्रकल्प, ४ लघु प्रकल्प तर ९ साठवण तलाव अशा एकूण १६ तलावांचा समावेश आहे. यंदा सर्वत्र रबी हंगामाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पाटबंधारे उपविभागातंर्गत एकूण ३ हजार ६१७ हेक्टर्सवर रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई आदी पिके घेण्यात आली आहेत.
१६ तलावांपैकी घरणी, साकोळ आणि देवर्जन हे तीन मध्यम प्रकल्प असल्याने या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. १ हजार ३८७ हेक्टर्सवर नवीन ऊस तर २० हेक्टर्सवर फळबाग लागवड करण्यात आली आहे, असे उपविभागीय अभियंता गोरख जाधव यांनी सांगितले.