तालुक्यात कोराेनाचा आलेख वाढला असून आतापर्यंत १,२५० बाधितांची नोंद झाली आहे. त्यातील ८६१ जणांनी उपचारानंतर ठणठणीत झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. २३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३६६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये २७, तर उदगीर, लातूरला ३७ जणांना रेफर करण्यात आले आहे. ८ जणांवर येथील ग्रामीण रुग्णालयातील डीसीएच मध्ये उपचार सुरू आहे. होमआयसोलेशनमध्ये २७५ जण असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी दिली.
तालुक्यातील चार गावामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने तिथे आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत. आरोग्य खात्याचे पथक तिथे तळ ठोकून आहे. एकुर्का गावात ८०, धामणगावात २८, सिंदगीत ४८, वांजरवाड्यात ४० कोरोना बाधित आहेत. पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या आदेशानुसार अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी वारंवार बैठका घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, तसेच कोविड चाचणी वाढवावी, अशा सूचना केल्या. तसेच गृह विलगीकरणातील व्यक्तींवर लक्ष ठेवण्यास सांगितले.
दररोज ४० पर्यंत संख्या...
आरोग्य विभागाकडून आवश्यक ती दक्षता घेऊन उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तालुक्यात पूर्वी दररोज ८० ते ९० बाधितांची भर पडत होती. आता ती ४० पर्यंत आली आहे. लवकरच येथील मुलींच्या वसतिगृहातून आरोग्य सेवा सुरु होणार आहे. तसेच डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.