लातूर : पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून ''स्वाध्याय'' अर्थात डिजिटल होम असेसमेंट योजना उपक्रम राबविला जात आहे. यासाठी जिल्ह्यातील ४० हजार ५६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ३२ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत स्वाध्याय मालिका पूर्ण केली आहे.
कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असले तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले नाही. इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्वाध्याय हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन प्रश्न स्वाध्यायमध्ये समाविष्ट करून व्हाॅट्सॲपद्वारे विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले जात आहेत. या उपक्रमात ४० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी असून, रेणापूर तालुक्यातील ३६१२, उदगीर ९६६१, औसा ६१५८, शिरूर अनंतपाळ १३६५, निलंगा ४३६९, देवणी १०१९, जळकोट ८६३, चाकूर १४००, अहमदपूर २११२, तर लातूर तालुक्यातील ३१०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात स्वाध्याय मालिका पूर्ण केली आहे.
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी - ४,७९,८२६
स्वाध्याय नोंदणी केलेले विद्यार्थी - ४०,५६९
स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी - ३२,६०६
मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यम...
कोरोनाच्या काळात अनेक शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रमावर भर दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घरीच अभ्यास व्हावा, यासाठी स्वाध्याय मालिका व्हाॅट्सॲपद्वारे सोडविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू या तीन माध्यमांचा समावेश असून, दर आठवड्याला नवीन प्रश्न दिले जातात. शिक्षण विभागाच्या वतीने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
विद्यार्थी म्हणतात...
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शिक्षकांनी स्वाध्याय उपक्रमाच्या लिंक ग्रुपवर शेअर केले आहेत. दर आठवड्याला नवीन प्रश्न असल्याने अभ्यासाची उजळणी होत आहे. आतापर्यंत १८ स्वाध्याय पूर्ण झाले असून, सर्व स्वाध्यायमध्ये सहभाग नोंदविला आहे. - विद्यार्थी
प्रत्येक विषयाशी निगडित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे परीक्षेची तयारी होत आहे. शाळेतून या उपक्रमात सहभागी होण्याच्या सूचना असल्याने सर्व मित्र यामध्ये सहभागी आहोत. घरीच प्रश्नमालिका सोडवायला मिळत आहे. - विद्यार्थी
उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी...
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत स्वाध्याय उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहेत. विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. एकंदरीत जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ३२ हजार विद्यार्थ्यांनी स्वाध्याय पूर्ण केला आहे. - तृप्ती अंधारे, माध्यमिक शिक्षणाधिकरी.
विद्यार्थ्यांसाठी सराव मालिका...
स्वाध्याय उपक्रमामध्ये दर आठवड्याला नवीन प्रश्न उपलब्ध करून दिले जातात. पहिली ते चौथीच्या शाळा बंद असल्याने ऑनलाईनबरोबर स्वाध्याय उपक्रम फायद्याचा ठरत आहे. विद्यार्थ्यांची उपक्रमात उपस्थिती वाढावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. - विशाल दशवंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी.