औसा तालुक्यातील नागरसोगा येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. मात्र, आता नागरसोगा, तपसे चिंचोली, दावतपूर येथे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दरम्यान, गावात बहुतांश ठिकाणी नागरिक विनामास्क फिरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच एकत्रित बसून मोबाईल गेम खेळणे असे प्रकार सुरूच आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स राखावा, सर्दी, ताप, खोकला, दम लागत असेल तर नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोनाची तपासणी करून घ्यावी. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.आर. शेख यांनी केले आहे.
नागरसोगा येथील आरोग्य उपकेंद्रात १५ रोजी ३४ जणांची कोरोना चाचणी झाली असता, त्यात ११ पॉझिटिव्ह आढळले. १६ रोजी ५८ जणांची तपासणी केली असता, त्यात ८ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १७ रोजी ८ बाधित आढळले आहेत. एकूणच गावात ३२ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, गावात डॉ. भाग्यश्री नागरे यांनी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून बाधित क्षेत्रामधील नागरिकांची तपासणी करीत आहेत. तसेच सरपंच सरोजा सूर्यवंशी, भास्कर सूर्यवंशी, उपसरपंच बंडू मसलकर हे गावात जनजागृती करीत आहेत.