लातूर : शहरात २ हजार ७०० नोंदणीकृत फेरीवाले असून, यातील १७०० फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्यासंदर्भात निर्णय नुकत्याच झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत झाला आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी मनपाने यापूर्वीच केली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने आता त्यांना शासनाकडून दीड हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
लातूर शहरात २ हजार ७०० नोंदणीकृत फेरीवाले आहेत. मात्र २०१४ च्या सर्व्हेनुसार ३ हजार १०० फेरीवाल्यांची संख्या होते. या सर्व्हेनुसार फेरीवाल्यांना शासनाची मदत मिळावी, अशी अपेक्षा समिती सदस्य त्रिंबक स्वामी यांनी व्यक्त केली आहे.
रस्त्याकडेला बसून भेळ, पाणीपुरी, ज्यूस, फळे, हळदी-कुंकू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांबरोबरच हातगाड्यांवर फिरता व्यवसाय करणाऱ्यांची नोंद फेरीवाला म्हणून झाली आहे. आता पुढील पंधरा दिवस संचारबंदीच्या काळात त्यांचा व्यवसाय बंद राहणार आहे. म्हणून शासनाने नोंदणीकृत फेरीवाल्यांना दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार लातूर मनपा हद्दीतील २ हजार ७०० फेरीवाले नोंदणीकृत आहेत. मात्र २०१४ मध्ये झालेल्या सर्वेनुसार ३ हजार १०० लोकांना ही मदत मिळावी, अशी मागणी आहे. मदत कधी मिळते, याकडे फेरीवाल्यांचे लक्ष लागले आहे.
लातूर शहरामध्ये फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी प्रशासनाने केली आहे. गेल्या वर्षभरापासून लाॅकडाऊन आणि संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कडक निर्बंध होते. त्यामुळे व्यवसाय करता आला नाही. परिणामी, उसनवारीवर उपजीविका करावी लागली. आता शासनाने तुटपुंजी का होईना मदतीची घोषणा केली आहे, ती कधी हातात पडते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. २०१४ च्या सर्व्हेनुसार झालेल्या नोंदणीकृत सर्वच फेरीवाल्यांना मदत मिळावी. - त्रिंबक स्वामी, मनपा फेरीवाला समिती सदस्य