लातूर : कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसत आहे. जवळपास तीन हजारांवर कर्मचारी लातूर जिल्ह्यातील पाच आगारांत कार्यरत आहेत. शासनाच्या आदेशानुसार चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, आदींच्या ३० टक्के उपस्थितीत कामकाज चालू आहे.
संचारबंदी लागू असल्यामुळे एसटीच्या मोजक्याच फेऱ्या सुरू आहेत. अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याने महामंडळाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मागील वर्षीपासून एसटीच्या उत्पन्नाला ग्रहण लागले आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे एसटीची चाके रुतल्याने महामंडळाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, वाहनात तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी यांत्रिकी कर्मचारी आवश्यक असल्याने त्यांची उपस्थिती ५० टक्केच आहे. प्रशासकीय, चालक, वाहकांसाठी ३० टक्के उपस्थिती आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाच्या वतीने शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कर्मचारी उपस्थितीचे प्रमाण राबविले जात असल्याचे लातूर विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
संचारबंदीमुळे प्रवाशांचा बसला अल्प प्रतिसाद आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, तसेच दुर्धर आजार अशा कामांसाठी प्रवाशांना एसटीतून प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. प्रवासी नसल्याने बसफेऱ्या रद्द आहेत. परिणामी, बस डेपोतच थांबून आहे.
- चालक
३० टक्के उपस्थितीचे प्रमाण असून, महामंडळाच्या आदेशानुसार वाहक व चालक कर्तव्यावर उपस्थित राहण्यास तयार आहेत. बससेवा बंद असल्याने घरीच थांबावे लागत आहे. बस डेपोतच असून, आदेश आल्यानंतर बसेस सुरू होतील आणि ड्युटी करता येईल.
- वाहक
शासनाने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पालन केले जात आहे. यांत्रिकी व प्रशासकीय विभागातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थिती आहे. शासनाच्या निर्देशानुसारच अंमलबजावणी केली जात आहे. सध्या संचारबंदीमुळे अल्प प्रतिसाद आहे.
- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, लातूर.