राज्यातील काही जिल्ह्यांत दुस-या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. सध्या अहमदपूर तालुक्यात एकूण ७२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात शहरात १८ तर ग्रामीण भागात ५४ रुग्ण आहे. यातील चिखलीत ११ व रोकडा सावरगावात २३ रुग्ण आहेत. रोकडा सावरगाव येथील काहीजण विवाह समारंभासाठी लातूरला गेल होते. त्यानंतर चाचणी करण्यात आली असता बाधित आढळले आहेत. विशेष म्हणजे, त्यात नवरदेव, नवरदेवाची आई पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.
तसेच चिखली येथील एका धार्मिक कार्यक्रमात १३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचेही काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्यांना गृह विलगीकरण करण्यात येऊन त्यांना औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात येत आहे. ८ रुग्ण लातूरच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
गृहविलगीकरणातील बाधितांमुळे संसर्ग पसरु नये म्हणून मरशिवणी येथील कोविड केअर सेंटरच्या उभारणीसंदर्भात तालुका आरोग्याधिका-यांना सूचना करण्यात आल्या आहेत. या सेंटरची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. सुनील दासरे यांनी केली.
स्वॅब देऊन बाधित बाहेरगावी...
शहरातील एक जोडपे चाचणीसाठी स्वॅब देऊन अहवाल येण्यापूर्वी बाहेरगावी रवाना झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागी झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोविड केअर सेंटर सुरू करण्याविषयी कार्यवाही केली जात आहे.
रोकडा सावरगाव तीन दिवस बंद...
रोकडा सावरगावात २३ पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा अहवाल अजून आला नाही. दरम्यान, गावातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स राखावा. मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गावची बससेवाही तूर्त बंद केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.