सप्टेबर २०२० पासून संजय गांधी निराधार योजनेची समिती अस्तित्वात नसल्याने श्रावणबाळ, संगायो, इंगायोसाठी प्रस्ताव दाखल केलेल्यांचे लक्ष लागून होते. त्यामुळे २६ जानेवारी रोजी तहसीलदार राहुल पाटील यांनी बैठक घेऊन योजनेतील १ हजार अर्ज बैठकीसमोर घेतले होते. त्यापैकी ६५० अर्ज मंजूर केले तर त्रुटींमुळे ३५० अर्ज नामंजूर केले होते.
दरम्यान, पालकमंत्री अमित देशमुख यांनी संगायो समिती निवडीसाठी शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी फेब्रुवारीत तालुक्यातील संगायो समिती जाहीर केली. या समितीची बैठक सोमवारी तहसील कार्यालयात पार पडली. समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील, तहसीलदार राहुल पाटील, शासकीय सदस्य तथा गटविकास अधिकारी मोहन अभंगे, सदस्य ॲड. प्रशांत अकनगिरे, डॉ. उमाकांत देशमुख, बाळकृष्ण माने, ॲड. शेषेराव हाके, व्यंकटेश पाटील, रूपेश चक्रे, कुलदीप सूर्यवंशी, प्रेमल शंकर कसपटे
यांच्यासह नायब तहसीलदार रंगनाथ कराड, लिपिक विठ्ठल राठोडे उपस्थित होते.
सदरील समितीने निकषनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज तात्काळ मंजूर केले. बैठकीत १ हजार २०० अर्ज ठेवण्यात आले. त्यापैकी संगायो, इंगायोचे ७५ व श्रावणबाळ योजनेतील ९१५ असे ९९० मंजूर झाले आहेत. उर्वरित २१० अर्ज काही त्रुटींमुळे नामंजूर झाले. ज्या प्रस्तावात त्रुटी निघाल्या आहेत. त्या लाभार्थ्यांना माहिती दिली जाईल. व त्यांच्याकडून त्रुटीची पूर्तता करून घेऊन पुढील बैठकीत त्या अर्जांना मंजुरी देण्यात येईल, असे संगायोचे अध्यक्ष गोविंद पाटील यांनी सांगितले.