अहमदपूर येथील पोलीस ठाण्यामध्ये शेकडो वाहने पडून आहेत. त्यात अपघातातील बेवारस, गुन्ह्यातील अनेक वाहनांचा समावेश आहे. सदरच्या वाहनांमुळे पोलीस ठाण्याचे मैदान पूर्ण भरले आहे. त्यामध्ये दुचाकींची संख्या अधिक आहे. सदर वाहने गंजली असून, अनेक वाहनांचे साहित्य खराब झाल्याचे दिसून येत आहे. अपघातातील व बेवारस सापडलेल्या १२२ वाहनांच्या लिलावाच्या प्रक्रियेसंबंधी तहसीलदारांकडे प्रस्ताव दाखल झाला आहे.
बेवारस वाहनांत दुचाकी, तीन चाकी ऑटो, जीप व कारचा समावेश आहे. मालकी हक्क असणारी कागदपत्र दोन महिन्यांच्या कालावधीत पोलीस ठाण्यात जमा करायची असून, शहानिशा झाल्यानंतर सदरील वाहन मालकास परत मिळणार आहे. आक्षेप न आल्यास प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाहनाचा लिलाव करून त्यांची भंगारात विक्री करण्यात येणार आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी सांगितले.