संदीप शिंदे
लातूर : जिल्ह्यात सध्या टंचाई नसून, पाणीपुरवठा विभागाकडे एकही गावाने प्रस्ताव दाखल केलेला नाही. संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ११ कोटी ७९ लाख ७० हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, मार्च ते जूनपर्यंत विविध उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.
गतवर्षी समाधानकारक पाऊस झालेला असल्याने पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जलस्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. मार्चमध्ये उन्हाचा पारा वाढल्यानंतर पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ११ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ८५५ गाव, वाडी-तांड्यावर कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, खाजगी विहीर, विंधन विहिरींचे अधिग्रहण करणे, नवीन विंधन विहीर घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना राबविणे, प्रगतिपथावरील योजना पूर्ण करणे, विहीर खोलीकरण, गाळ काढणे, बुडक्या घेणे आदी कामे केली जाणार आहेत. औसा, निलंगा, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट, लातूर, चाकूर, उदगीर, जळकोट, अहमदपूर आदी तालुक्यांतील गावांमध्ये ही कामे राबविली जाणार आहेत. प्रारंभी ज्या गावात पाणीटंचाईची समस्या आहे, त्यांना तालुकास्तरावर पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतर टंचाई निवारण कक्षाच्या वतीने पडताळणी करून उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या कालावधीसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
टँकरसाठी ७६ लाखांची तरतूद...
जिल्ह्यातील काही गावांत मार्चनंतर पाण्याची समस्या निर्माण होते. त्यासाठी जवळील जलस्रोत अधिग्रहण करून नागरिकांची तहान भागविली जाते. कृती आराखड्यानुसार ५० हून अधिक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागू शकतो, त्यासाठी ७६ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
सध्या एकही प्रस्ताव दाखल नाही...
टंचाई निवारणासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून, पंचायत समिती स्तरावरील प्रस्ताव या कक्षाकडे दाखल केले जातात. सध्या मार्च महिना सुरू झाला असला तरी ८५५ गावस्तरावरून प्रस्ताव दाखल झालेला नाही. प्रस्ताव दाखल होताच तात्काळ पडताळणी करून उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
३२० गावांत नवीन विंधन विहिरीचे नियोजन...
जिल्ह्यात जवळपास ३२० गावांत नवीन विंधन विहीर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी २ कोटी ६६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच विहिरीचे खोलीकरण, गाळ काढणे आदी कामे केली जाणार आहेत. विंधन विहीर घेतल्यानंतर त्याठिकाणावरून पाइपलाइनद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.
नळ योजनेची होणार दुरुस्ती...
कृती आराखड्यानुसार ३० गावांत नळ योजनेची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी २ कोटींहून अधिक निधी खर्च केला जाणार आहे. टंचाई काळात प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन, कामांची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील एकूण गावे - ८५५
बोअरवेलची दुरुस्ती होणार - ५१ गावे
विहिरीमधील गाळ काढणार - ४३ गावे
पाणीटंचाई भेडसावणारी गावे - २५५
नवीन विंधन विहिरीची कामे - ३३५ गावे
पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती - २५ गावे