कोल्हापूर जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा १६ सप्टेंबरला दुपारी १ वाजता राधानगरी पंचायत समितीमध्ये होणार आहे. अध्यक्ष राहुल पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेत होणारी ही सभा राधानगरीला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या काही सभा अन्य तालुक्यांमध्ये घेण्याची प्रथा आहे. शौमिका महाडिक अध्यक्ष असतानाही त्यांनी आजरा येथे एक स्थायी सभा घेतली होती. यानंतर बजरंग पाटील अध्यक्ष असताना त्यांनी हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे सभा घेतली होती. आता राहुल पाटील यांनी स्थायी समितीसाठी राधानगरीची निवड केली आहे.
विद्यमान सभागृहाची मुदत संपत आल्याने आयत्यावेळच्या विषयांमध्ये विविध विकासकामांना मंजुरी घेण्यासाठी आता सोमवारपासून जिल्हा परिषदेत धांदल उडणार आहे. स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय विषय सर्वसाधारण सभेपुढे नेता येत नसल्याने यासाठीच्या हालचाली आता वेग धरणार आहेत.