कोल्हापूर : अलाबाद (ता. कागल) येथे उसाच्या बिलाचे साठ हजार रुपये लंपास करण्यासाठी वृद्धाचा खून केल्याप्रकरणी आरोपी युवराज संपतराव घोरपडे (वय ३६, रा. माद्याळ, ता. कागल) याला मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी जन्मठेप व एक हजार रुपये दंड ठोठावला. दत्तात्रय महादेव पाटील (६२, रा. बेलेवाडी, ता. कागल) यांचा खून केला होता. मुरगूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ मे २०१३ रोजी भीमराव कामते यांच्या शेताजवळ अज्ञात पुरुषाच्या डोक्यात वार करून त्याचा खून करून मृतदेह अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हा मृतदेह दत्तात्रय महादेव पाटील (६२, रा. बेलेवाडी, ता. कागल) यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, आरोपी युवराज घोरपडे याच्यासमवेत ते कापशी येथे दारू पिण्यासाठी गेले होते. घटनास्थळी दारूच्या दोन बाटल्या व घोरपडे याच्या नावचे अर्धवट जळालेले ओळखपत्र मिळाले होते. या घटनेनंतर आरोपी घोरपडे याने ११ मे रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सरकार पक्षाचा पूर्ण पुरावा परिस्थितीजन्य होता. तपास अधिकारी अजितकुमार जाधव यांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी १५ साक्षीदार तपासले होते. मृत पाटील यांच्या घरचे व शेजारील साक्षीदार एकूण आठजण आरोपीच्या भीतीमुळे फितुर झाले होते. परंतु पोलीस पाटील सुरेश पाटील, गार्ड संभाजी तुकाराम पाटील, वैद्यकीय अधिकारी बापूसो सातपुते, तपास अधिकारी जाधव यांच्या साक्षी ग्राह्य मानून आरोपीला जन्मठेप, हजार रुपये दंड, तो न भरल्यास एक महिना सक्तमजुरी व तीन वर्षे सक्तमजुरी व हजार रुपये दंड ठोठावला. छायाचित्रकारांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न आरोपी युवराज घोरपडे याला पोलिसांनी हातामध्ये बेड्या घालून न्यायालयाबाहेर आणले. यावेळी त्याच्या फोटोसाठी छायाचित्रकार पुढे सरसावले. यावेळी अचानक त्याने पोलिसांच्या हाताला हिसडा मारत छायाचित्रकारांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला व शिवीगाळही केली.
वृद्धाच्या खूनप्रकरणी युवकास जन्मठेप
By admin | Updated: November 25, 2015 00:54 IST