कोल्हापूर : तरुणाईचा ओसंडून वाहणारा उत्साह, ठेका धरायला लावणारा रॉक बँड, भारतीय आणि वेस्टर्न प्रकारातील धडाकेबाज नृत्य अशा भन्नाट वातावरणात आज, रविवारी ‘सतेज यूथ फेस्ट’मध्ये दिवसभर कोल्हापुरातील तरुणाईने टेन्शन खल्लास एकच कल्ला केला. सुटीची संधी साधत युवक-युवतींनी फेस्टला गर्दी केली होती. रॉकिंग डीजे, झगमगते लाईट, सर्वत्र केलेल्या आकर्षक सजावटीने वातावणात रंग भरला. नृत्य, वादविवाद, फेस पेंटिंग, बेस्ट आॅफ वेस्ट अशा सर्वच प्रकारांत युवक-युवतींच्या कौशल्याचे दर्शन घडले.येथील ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्कमध्ये सतेज पाटील फौंडेशनतर्फे आयोजित भरपूर स्पर्धांनी खचाखच भरलेल्या या फेस्टची आजची सुरुवात वादविवाद स्पर्धेने झाली. त्यात सहभागी ४० संघांनी सोशल मीडिया, क्रिकेटचा अतिरेक, लोकपाल विधेयक, एचआयव्ही टेस्ट गरजेची आहे का?, महाविद्यालयीन निवडणुका, महिला आरक्षण, आदी विषयांतून सामाजिक वास्तव मांडले. त्यानंतर एका मागे एक स्पर्धा सुरू झाल्या. त्यात ‘कोल्हापुरी टॅलेंट हंट’चा प्रारंभ राजाराम कॉलेजच्या भाग्यश्री बाचलच्या भरतनाट्यम्ने झाला. केआयटीच्या वरदा करंदीकरने सादर केलेल्या वेस्टर्न डान्सला टाळ-शिट्ट्यांची दाद मिळाली. ‘टीकेआयटी’च्या तेजश्री दिवाणचे सिंथेरायझरचे वादन, कॉमर्स कॉलेजच्या श्रीधर गुरव, डीवायपी मेडिकलच्या अनिरुद्ध वाघच्या गझल गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महावीर कॉलेजच्या पवन अॅण्ड ग्रुपने व्हीलचेअर डान्सद्वारे सर्वांना थक्क केले. नर्सिंग कॉलेजच्या वर्षा अष्टेकरने ठसकेदार लावणी सादर केली. आर्किटेक्ट कॉलेजच्या प्रथमेश बेडेकरने मर्दानी खेळांचा थरार दाखविला. हंटमध्ये भारतीय आणि वेस्टर्न प्रकारातील नृत्य, रॉकबँड, सिंथेसायझर व व्हायोलिन वादन, मर्दानी खेळ यातून १७ स्पर्धकांनी धडाकेबाज सादरीकरण केले. त्याला युवक-युवतींनी गर्दी केली होती. ‘सेव्ह द टायगर’, ‘आतंकवाद रोखा’, ‘सेव्ह द बेबी गर्ल’ असे सामाजिक संदेश ‘फेस पेटिंग’द्वारे तरुणाईने दिले. टाकाऊपासून टिकाऊ बनविण्याच्या ‘बेस्ट आॅफ वेस्ट’ मध्ये २७ संघांतील स्पर्धकांचा कस लागला. जिन्स व टी-शर्टद्वारे पर्स आणि सॅक, टायर व डब्यांपासून पक्ष्यांना पाणी व धान्य ठेवण्याचे साधन, फुलदाणी, कपडे वाळत घालण्याचे स्टँड, गणपतीची प्रतिकृती आदी बनविले. ही कौशल्ये यंगिस्तानच्या पसंतीस उतरली. फॅशन शोमधून देशातील विविधतेचे दर्शन घडविले. शिवाय त्यातून सामाजिक संदेशदेखील दिले. रॉकिंग डीजेच्या तालावर युवक-युवती बेधुंदपणे थिरकल्या. (प्रतिनिधी)
तरुणाईचा तुफानी जल्लोष...- ‘सतेज यूथ फेस्ट’चा समारोप
By admin | Updated: August 25, 2014 00:06 IST